बारामती, माहीमसह महाराष्ट्रातील या पाच मतदारसंघांच्या लढतींकडं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

फोटो स्रोत, facebook
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठी
सहा प्रमुख पक्ष असलेल्या यंदाच्या निवडणुकीचा आजचा हा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे.
अत्यंत स्पर्धात्मक वळणावर असलेल्या या राजकीय लढतींसाठी 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
अनेक ठिकाणी महायुती विरूद्ध महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्या एकमेकांशी भिडणार आहेत.
या राजकीय संघर्षात राज ठाकरे यांची मनसे, असदुद्दीन ओवेसी यांची AIMIM, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यासारख्या इतर राजकीय पक्षांची भूमिका देखील येणाऱ्या काळात प्रभावी ठरणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे.
त्यामुळे विधानसभेतील संख्याबळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांसाठी राज्यभर फिरत जोरदार प्रचार केला.
यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारामती, माहीम, कोल्हापूर उत्तर, कर्जत-जामखेड, वांद्रे पूर्व या मतदारसंघातील लढतींकडे सगळ्याचं विशेष लक्ष का लागलं आहे याचा आढावा या लेखातून घेण्यात आला आहे.


1. बारामती विधानसभा मतदार संघ
पवार कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलेल्या बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे.
बंडखोरी करुन भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठा आणि अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते आहे.
तर शरद पवारांनी युगेंद्र यांना उभे करुन अजित पवारांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. असं असलं तरी कोण जिंकू शकेल याचा अंदाज बांधणे कठीण असल्यामुळे ही लढत चुरशीची झाली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
अत्यंत अटीतटीच्या या लढतीत संपूर्ण प्रचारात अजित पवारांचा जोर हा बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावर होता तर शरद पवारांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा भावनिक लाटेचं गणित मांडलं.
काका-पुतण्याच्या या चुरशीच्या लढतीत बारामती कुणाची या प्रश्नाचं उत्तर या निवडणुकीतून मिळणार असल्यामुळे या मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे खास लक्ष लागले आहे.
त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामतीत दादांची दादागिरी चालणार की युगेंद्र पवारांच्या राजकारणाचा उदय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2. माहिम विधानसभा मतदार संघ
मुंबईत 36 मतदार संघात निवडणूक होत आहे, परंतु मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहिम मतदार संघातील ही विशेष लक्षवेधी बनली आहे.
त्यांच्या समोर शिवसेना (शिंदे गटा)कडून विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांचं तगडं आव्हान आहे. बसपाचे सुधीर जाधव देखील या शर्यतीत आहेत.
खरंतर 1990 पासून माहिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवाय महेश सावंत आणि सदा सरवणकर यांची या मतदार संघावर चांगली पकड आहे.
तर राज ठाकरे त्यांच्या खास शैलीतून सत्ताधारी असो वा विरोधक सगळ्यांचाच समाचार जाहीर सभेतून घेताना दिसतात.

मात्र मनसेला मानणाऱ्या वर्गाचे मतांमध्ये परिवर्तन झाले असल्याचे गेल्या काही निवडणुकांमध्ये जाणवले नाही. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी असणार नाही.
शिवाय वेळोवेळी राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे, असं जाणकार सांगतात.
परंतु जर अमित ठाकरे विजयी झाले तर ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य असतील जे शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क या शिवसेनेशी संबंधित खास असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील.
कारण शिवसेनेचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन आणि शिवसेनेची स्थापना झालेले शिवाजी पार्क मैदान हे माहीम विधानसभा मतदारसंघात येते.
या तिरंगी लढत असलेल्या या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
3. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ
कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांच्यातील लढत पाहायला मिळणार आहे.
रोहित पवारांनी 2019 साली बारामतीला खेटून असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण केले होते.
कर्जत-जामखेडमध्ये वर्चस्व असलेल्या भाजपच्या राम शिंदे यांचा तब्बल 43 हजार मतांनी पराभव करत रोहित पवारांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यामुळे रोहित पवारांसाठी आपला किल्ला राखणे हे आव्हान असणार आहे.

लोकसभेला कर्जत-जामखेडमधून निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं मोठं मताधिक्य मिळवलं होतं याचा फायदा रोहित पवारांना होण्याची शक्यता आहे.
शिवाय त्यांना काँग्रेस आणि ठाकरे गटाची साथ आहे. तर राम शिंदे यांनी भाजपचा कर्जत-जामखेड हा गड परत मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
शिवाय अजित पवार गट महायुतीसोबत असल्यामुळे त्याचा फायदा राम शिंदेंना होण्याची शक्यता आहे. कमालीची चुरस वाढलेल्या या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
'भूमिपुत्र विरूद्ध राजपुत्र' असा प्रचार शिंदेकडून करण्यात आला आहे.
तेव्हा या मतदारसंघात नेमकं कोण निवडून येईल हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष 23 तारखेकडे लागले आहे.
4. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
वांद्रे पूर्व विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी आणि मनसेच्या तृप्ती सावंत मैदानात उतरले आहेत.
मुंबई भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा यांनी मनसेमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्यामुळे वरुण सरदेसाई आणि झीशान सिद्दीकी यांच्यासाठी ही लढत सोपी राहिली नाही.
शिवसेनेचे दिवंगत आमदार असलेल्या प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या तृप्ती सावंत या पत्नी आहेत. त्यांनी 2015 सालच्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर नारायण राणेंचा पराभव केला होता.
तर गेल्या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेले परंतु आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

फोटो स्रोत, facebook
काही दिवसांपूर्वी झीशान यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळे झीशान यांना त्यांच्या मतदारसंघात सहानुभूती मिळेल अशी चर्चा आहे.
परंतु शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा फटका झीशान सिद्दिकींना बसण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्वची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री हे या मतदारसंघात येतं.
त्यामुळे मातोश्रीच्या अंगणातून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अत्यंत चुरशीच्या या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.
5. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ
कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात हायहोल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला.
विधानसभेचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक असताना काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अचानक माघार घेत काँग्रेसला मोठा धक्का दिला.
त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या राजकारणाला वेगळेच वळण मिळाले. मधुरीमाराजेंची अशी माघार जिव्हारी लागलेल्या सतेज पाटलांसाठी ही लढाई आता अधिकच महत्वाची आणि प्रतिष्ठेची झाली.

शिवाय या घडामोडींमुळे त्यांच्याविषयी कोल्हापुरात सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे. खरंतर अगदी सुरुवातीला काँग्रेसने सतेज पाटील यांच्या प्रथम पसंतीचे उमेदवार राजेश लाटकर यांनाच उमेदवारी दिली होती.
परंतु राजेश लाटकर हे शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांच्या तुलनेत फार ताकदीचे प्रतिस्पर्धी असल्याचे मानले जात नव्हते.
त्यामुळे त्यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या विजयासाठी पराकोटीचे प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे महायुतीचे तगडे उमेदवार असलेल्या राजेश क्षीरसागर यांच्यासाठी सुरूवातील सोपी वाटणाऱ्या परंतु आता अटीतटीची बनलेल्या या निवडणुकीत आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.