'मुलं पायावर उभी होईपर्यंत वेश्या व्यवसाय करणारच', अमळनेरची 'हरदासींची वस्ती' का आहे चर्चेत?

फोटो स्रोत, Abhijeet Tangade
- Author, संजना खंडारे
- Role, बीबीसी मराठीसाठी
इथं कुणी खिडकीतून किंवा दारात उभं राहून इशारे, हातवारे किंवा आवाज देऊन पुरुषांना बोलवत नाही. तसंच कुणी तोकडे कपडेही घातलेले नसतात. एवढंच काय, पण या वस्तीत शिरल्यावर इथं वेश्याव्यवसाय चालतो, याचा संशयही कुणाला येणार नाही. अगदी फिल्मी स्टाईल वेश्यालयांप्रमाणे रोषणाई किंवा दलालही दिसत नाहीत.
ही वस्ती म्हणजे जळगावच्या अमळनेरमधील गांधीलपुरा.
इतर वस्त्यांप्रमाणेच अमळनेर तालुक्यातली ही मुस्लीमबहुल भागातली शांत वस्ती. इथला इतिहासही 150 वर्षांहून अधिकचा.
पण सध्या इथल्या 100 हून अधिक वेश्यांसमोर एक संकट उभं ठाकलं आहे. डोक्यावरचं छप्पर हिरावण्याची भीती त्यांना आहे.
जवळपास 15 वर्षांपासून या दहशतीत इथल्या वेश्या आहेत. पण यांना विरोध करणारे किंवा इथून घालवण्यासाठी प्रयत्न करणारे लोक कोण आहेत? नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.
(या वृत्तांकनातील महिलांची नावं बदललेली आहेत.)
कविता या 34 वर्षीय महिलाही याठिकाणी वेश्या व्यवसाय करतात. त्यांना दोन मुली आहेत.
त्यांच्या अडचणींबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, "या वस्तीमुळे येथे राहणाऱ्या लोकांच्या मुलींची लग्न होत नसल्याचं लोक सांगतात. पण प्रत्यक्षात त्यांच्या मुलींना दोन-दोन लेकरं झालीत. मग ते खोटे आरोप का करतात? गिऱ्हाईकं आमच्याकडं येऊ नये म्हणून, त्यांना अडवून मारहाण करतात, त्यांची लूट करतात."
"काही दिवसांपासून भीतीमुळं कस्टमर येत नाहीत. आमच्याबद्दल नको त्या अफवा पसरवल्या जात आहेत. आमचं इतकंच म्हणणं आहे की, तुमच्यासारखंच आम्हाला शांततेत जगू द्या. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करत आहोत. त्यामुळं आम्ही ते बंद नाही करणार," असं कविता त्यांची कैफियत मांडताना बोलत होत्या.

फोटो स्रोत, Abhijeet Tangade
अमिनाही इथं वेश्या व्यवसाय करणाऱ्यांपैकीच एक.
त्या म्हणाल्या की, "आम्ही कित्येक वर्षांपासून इथं वेश्याव्यवसाय करतोय. आतापर्यंत कोणाला अडचण नव्हती. आता काय अडचण आहे? आमच्यामुळे त्यांच्या लेकरा-बाळांची लग्न होत नाहीत, असं ते म्हणतात. मग आमच्या लेकरांची लग्न कशी होतात");