राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा पराभव, ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी

अमित ठाकरे महेश सावंत

हा मजकूर पाहण्यासाठी जावा स्क्रिप्ट आणि स्थिर इंटरनेट असणं आवश्यक आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पराभूत झाले आहेत आणि ते तिसऱ्या स्थानी राहिले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश सावंत विजयी झाले आहेत, तर शिंदे गटाचे सदा सरवणकर दुसऱ्या स्थानी राहिले आहेत.

माहीममध्ये 18 फेऱ्यांची मतमोजणी झाली.

18 व्या म्हणजे शेवटच्या फेरीअखेर कुणाला किती मतं मिळाली :

  • महेश सावंत (शिवसेना - उबाठा) - 46,579
  • सदा सरवणकर (शिवसेना - शिंदे गट) - 45239
  • अमित ठाकरे (मनसे) - 30703

शिवसेनेचं मुख्यालय असलेला माहीम मतदारसंघ ठाकरे गटानं राखला आहे. या मतदारसंघातील लढत चुरशीची ठरली, ती राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्यामुळे.

शिवसेना भवन, शिवाजी पार्क, बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ आणि राज ठाकरे यांचं निवासस्थान अशी महत्त्वाची ठिकाणं असणारा शिवसेनेचा बालेकिल्ला माहिम विधानसभा मतदारसंघात आहे.

अमित ठाकरेंची ही पहिलीच निवडणूक होती. मात्र, याच निवडणुकीत त्यांना पराभव पाहण्याची वेळ आली आहे.

राज ठाकरेंनी महायुतीला पूरक भूमिका घेतली असतानाही, अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकरांच्या रूपानं उमेदवार दिला गेला. सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न झाले. मात्र, सरवणकर उमेदवारीवर ठाम राहिले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते, मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली. त्यानंतर तर सरवणकर मैदानातच राहतील, हे स्पष्ट झालं.

दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षानेही दादरचे विभागप्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली.

अशाप्रकारे माहीमची निवडणूक तिरंगी लढत झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं.

महेश सावंत

मतदारसंघाची रचना आणि इतिहास

दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्क आणि माहिमचा भाग हा परिसर माहिम विधानसभा मतदारसंघात येतो.

दादरमध्ये शिवसेनेचा जन्म झाला, त्यानतंर बाळासाहेबांची पहिली सभाही शिवाजी पार्कवर झाली, शिवसेनेचा दसरा मेळावाही शिवाजी पार्कवर न चुकता होतो. बाळासाहेबांचं स्मारकही शिवाजी पार्कमध्येच आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेसाठी फार महत्त्वाचा आहे.

आधी दादर मतदारसंघ हा वेगळा होता. या मतदारसंघात 1990 पासून शिवसेनेचं एकहाती वर्चस्व होतं. मनोहर जोशी, विशाखा राऊत आणि नंतर 2004 ला सदा सरवणकर या मतदारसंघातून निवडून आले होते. पण, 2008 मध्ये या मतदारसंघाची पुनरर्चना होऊन दादर-माहिम असा विधानसभा मतदारसंघ तयार झाला.

आधीच्या माहिम मदारसंघातही 1990 पासून शिवसेनेचं वर्चस्व होतं. शिवसेनेच्या सुरेश गंभीर यांनी 2004 पर्यंत मतदारसंघ राखला होता. पण, 2008 ला मतदारसंघाची पुनरर्चना होऊन माहिम विधानसभा मतदारसंघ तयार झाला.

व्हीडिओ कॅप्शन, सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणातच, राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानंतर म्हणतात...
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सदा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2009 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली.

शिवसेनेनं आदेश बांदेकरांना उमेदवारी दिली होती. तसेच मनसेही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होती. मनसेनं नितीन सरदेसाईंना मैदानात उतरवलं होतं. यावेळी नितीन सरदेसाई यांनी 48 हजार मतं घेत सदा सरवणकर यांचा पराभव केला होता, तर शिवसेनेचे आदेश बांदेकर तिसऱ्या स्थानावर होते. पण, 2014 च्या आधी सदा सरवणकर यांनी घरवापसी केली आणि शिवसेनेकडून पुन्हा आमदार झाले.

त्यांनी 6 हजार मतांनी शिवसेनेचा पराभव केला होता. 2014 ला सगळे पक्ष स्वबळावर लढल्यानं या मतदारसंघात भाजपनेही विलास आंबेकर यांना उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांना 33 हजार मतं मिळाली होती. त्यामुळे इथं काही प्रमाणात भाजपला मानणारा वर्गही आहे हे विसरून चालणार नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतही सदा सरवणकर हेच शिवसेनेचे उमेदवार होते, तर मनसेनं त्यांचा उमेदवार बदलून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली होती. यावेळी सरवणकरांनी 21 हजार मतांनी देशपांडेंचा पराभव केला होता. संदीप देशपांडेंना 42 हजार 690 मतं मिळाली होती.

ठाकरेंचं राजकारण कुस बदलतंय का?

ठाकरे घराण्याची परंपरा पाहिली तरी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आधी कधीही थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले नाहीत. 1995 ला युतीचं सरकार होतं त्यावेळीही ठाकरे कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवली नव्हती. पण, 2019 ला या परंपरेला छेद बसला.

शिवसेना पक्षाची स्थापना होऊन 50 वर्ष झाल्यानंतर तिसऱ्या पिढीतील ठाकरेंनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. आदित्य ठाकरेंच्या स्वरूपात पहिल्या ठाकरेंनी प्रत्यक्षात निवडणूक लढवली होती आणि ते जिंकूनही आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाले.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे (फाईल फोटो)

राज ठाकरेंनी स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही. पण, त्यांचा मुलगा अमित ठाकरे आता लोकांमधून निवडणूक लढवत आहे. यावेळी ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन तरुण नेतृत्व निवडणुकीच्या मैदानात असतील.

पक्ष संघटनेवर पकड ठेवून रिमोट कंट्रोल सांभाळणारे ठाकरे ते निवडणूक लढवणारे ठाकरे इथंपर्यंत ठाकरेंच्या राजकारणाचा प्रवास येऊन पोहोचला आहे. त्यामुळे ठाकरेंचं राजकारण कूस बदलतंय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

ठाकरेंचा उमेदवार महेश सावंत कोण आहे?

महेश सावंत हे 1990 पासून शिवसेनेत सक्रिय आहेत. सदा सरवणकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

सदा सरवणकर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळी महेश सावंतही त्यांच्यासोबत गेले होते. पण, पुन्हा ते शिवसेनेत परतले.

2017 ला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती.

यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. तेव्हापासून सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. तसेच शिवसेनेतील फुटीनंतर सदा सरवणकर शिंदेंसोबत गेले तेव्हा महेश सावंत ठाकरेंसोबत राहिले.

तीन सेनेत लढत

आता माहिम विधानसभा मतदारसंघातील लढत नेमकी कशी होईल? याबद्दल बीबीसी मराठीने जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांच्याशी बातचित केली होती.

अकोलकर म्हणाले होते की, “बाळासाहेबांच्या पक्षाचे तीन तुकडे झाले. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या तिघांचीही सेना आता महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एकमेकांविरोधात लढणार आहे. त्यामुळे ही लढत लक्षवेधी असणार आहे."

ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

प्रकाश अकोलकर असंही म्हणाले होते की, "गेल्यावेळी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना निवडणूक लढायला लावली. त्यामुळे यावेळी राज ठाकरेंनी आपल्या मुलाला निवडणुकीत उतरवलं असेल. दादर हे शिवसेनेचं जन्मस्थान आहे. इथला बाळासाहेबांवर निष्ठा असणारा शिवसैनिक कोणत्या सेनेकडे जातो यावर निकाल अवलंबून असेल. यावरून खरी शिवसेना कोणती याचाही निकाल या मतदारसंघात लागणार आहे."

"इथं शिवसैनिक विचार करताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असाच विचार करतील. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विचार होईल. उद्धव ठाकरेंवर नाराज असणारे शिवसैनिक हे दुसरा पर्याय म्हणून राज ठाकरेंच्या उमेदवाराकडे बघतील. त्याचा फटका हा सरवणकरांना बसण्याची शक्यता आहे," असं प्रकाश अकोलकर सांगितलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)