टिकटॉकवर व्हीडिओ पोस्ट करते म्हणून बापाने मुलीला थेट गोळ्या घातल्या; आधी बनाव, मग केला गुन्हा कबुल

मुलीचे टिकटॉकवरील व्हीडिओ आक्षेपार्ह वाटल्याचं वडिलांनी सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुलीचे टिकटॉकवरील व्हीडिओ आक्षेपार्ह वाटल्याचं वडिलांनी सांगितलं आहे.
  • Author, केली एनजी
  • Role, बीबीसी न्यूज

एका व्यक्तीनं आपल्या किशोरवयीन मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अलीकडेच तो कुटुंबाला अमेरिकेतून पाकिस्तानात परत घेऊन आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला आपल्या मुलीचे टिकटॉकवर व्हीडिओ बनवणं पसंत नव्हतं.

याप्रकरणी अन्वर उल-हकवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी (28 जानेवारी) मुलगी हिरा हिला क्वेट्टा शहरात गोळ्या घातल्याचं त्यानं कबूल केलं. सुरुवातीला मात्र या गोळीबारामागे अज्ञात व्यक्तींचा हात असल्याचं त्यानं सांगितलं होतं.

अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या अन्वर उल-हकनं सांगितलं की, त्याला त्याच्या मुलीच्या पोस्ट आक्षेपार्ह वाटल्या.

पोलीस या प्रकरणी ऑनर किलिंगची शक्यताही तपासून पाहत आहेत. पाकिस्तानात ऑनर किलिंगच्या घटना सातत्यानं समोर येत असतात.

पाकिस्तानमध्ये दरवर्षी शेकडो लोक ज्यात बहुतेक महिला असतात, त्या तथाकथित ऑनर किलिंगमध्ये मारल्या जातात, असं मानवाधिकार संघटनांचं म्हणणं आहे.

या हत्या बहुतेकदा नातेवाईकच करतात. कुटुंबाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी ते असं करत असल्याचा ते दावा करतात.

हिरा अन्वरचं वय 13 ते 14 वर्षांच्या दरम्यान होतं. तिची कपडे घालण्याची पद्धत, जीवनशैली आणि मित्रांच्या भेटीगाठी यावर तिच्या वडिलांना आक्षेप असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

हे कुटुंब अमेरिकेमध्ये 25 वर्षांपासून वास्तव्य करत होतं. हिराचं कुटुंब पाकिस्तानात परत येण्यापूर्वीच तिनं टिकटॉकवर व्हीडिओ टाकायला सुरुवात केली होती.

पोलिसांनी हिराचा फोन ताब्यात घेतला असून तो लॉक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या हत्येप्रकरणी हिराच्या वडिलांच्या मेहुण्यालाही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

लाल रेष
लाल रेष

हे ऑनर किलिंगचं प्रकरण असल्यास आणि आरोपी दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल. कारण 2016 मध्ये पाकिस्तान सरकारनं याबाबतच्या कायद्यात तसा बदल कला आहे. त्यापूर्वी पीडितेच्या कुटुंबानं संबंधित आरोपींना माफ केल्यास त्यांचा तुरुंगवास टळत होता.

2023 मध्ये, इटालियन न्यायालयानं एका पाकिस्तानी जोडप्याला त्यांच्या 18 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या मुलीनं अरेंज मॅरेज करण्याला नकार दिल्यामुळे तिची हत्या करण्यात आली होती.

पाकिस्तानी सोशल मीडिया स्टार कंदील बलोचच्या भावाची तिच्या हत्याप्रकरणात वर्षभरापूर्वी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 2016 साली त्याने कंदीलच्या हत्येची कबुली दिल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कंदीलमुळे कुटुंबाची मान शरमेने खाली झुकते, असं त्यावेळी तो म्हणाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)