तरुणाची हत्या करुन इन्स्टाग्रामवर रिल... लोक इतके क्रूर का होतात?

- Author, अमरेंद्र यरगागड्डा
- Role, बीबीसी तेलगू प्रतिनिधी
अलिकडच्या काळात तरुणांमधील, शालेय विद्यार्थ्यांमधील हिंसाचार हा चिंतेचा विषय झाला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा विकृत स्वरुपाचे व्हिडिओ पोस्ट केले जातात. हैदराबादमध्ये झालेला निर्घृण खून आणि त्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हीडिओ हा याच विकृतीचा भाग आहे.
(सूचना: या लेखातील माहिती विचलित करणारी आहे)
तेलंगणा पोलिसांनी सांगितलं की काही तरुणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली आणि त्याचे व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. यात त्यांनी हत्येसाठी वापरलेला चाकू आणि मृताचे रक्त लागलेले हात या व्हीडिओत दाखवण्यात आले होते. हे व्हीडिओ व्हायरल झाल्याचं सांगितलं जातं आहे.
हैदराबादमधील प्रगतीनगर इथं ही घटना घडली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, अनेक मित्रांना एकत्र करुन हा हल्ला करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
तेजस साई ऊर्फ डील हा 21 वर्षांचा तरुण मजूर म्हणून काम करायचा. तो एस. आर. नगरच्या दासाराम वस्तीमध्ये राहायचा.
तरुण रॉय या तरुणाचा ऑक्टोबरमध्ये निरुडू येथे खून केल्याप्रकरणी तेजस साईची रवानगी तुरुंगात झाली. जवळपास दोन महिन्यांआधीच त्याची जामिनावर सुटका झाली होती.
नंतर तो एस आर नगरऐवजी प्रगतीनगर मध्ये राहू लागला होता. त्याच्यासोबत त्याची आईदेखील राहत होती, असं कुकटपल्लीचे एसीपी, के श्रीनिवास राव यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं.
आम्हाला असं वाटतं की, तेजसचा खून सोमवारी पहाटे 2-3 वाजेदरम्यान झाला. प्रगतीनगरमधील तलावाच्या बांधाजवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तेजस त्याच्या आईबरोबर राहतो. एस. आर. नगरमध्ये राहिल्यास त्याच्या जीवाला धोका असेल असं त्याला वाटतं.
दोन दिवसांअगोदर तेजसची आई वेमुलावाडा इथं गेली होती. शिवप्पा नावाची व्यक्ती दोन दिवस तेजसबरोबर दारू पित होती. सोमवारी पहाटेपर्यंत तेजस शिवप्पाबरोबर दारू पित होता.
त्याचवेळी काही तरुणांनी तेजसवर चाकू-सुऱ्यांनी हल्ला केला. यात समीर आणि महेश हे तेजसचे मित्र देखील होते.
तेजसला पाठलाग बाथुकामा घाटापर्यत करण्यात आला आणि त्याच्या घराजवळ त्याचा खून करण्यात आला, असं श्रीनिवासा राव यांनी बीबीसीला सांगितलं.
दसऱ्याच्या दिवशी एसआर नगरमध्ये तरुण रॉय नावाच्या तरुणाचा खून झाला होता.
काही तरुणांनी त्याला दगडानं ठेचून मारलं होतं. त्यानंतर एसआर नगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर क्रं 852/2023 नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तेजस तिसरा आरोपी होता. एसीपी राव म्हणाले, तरुणच्या खूनाचा बदला घेण्यासाठी तेजसचा खून करण्यात आला.
या हत्येत किती लोकांचा सहभाग होता?
तेजसचा खून झालेली जागा पुराव्याचा भाग म्हणून पोलिसांनी सील केली आहे.
सध्या त्या ठिकाणी जाण्याची कोणालाही परवानगी नाही.
तेजसचा मृतदेह पडला होता त्या जागेच्या अवतीभोवती पोलिसांनी दोर बांधले आहेत. तिथं रस्त्यावर रक्ताचे डाग पडले आहेत.
एसीपी म्हणाले, या हत्येत किती जणांचा सहभाग होता याचा आम्ही शोध घेत आहोत.
या खुनात 10-15 जणांचा सहभाग असल्याचं सांगितलं जात असलं तरी नक्की कितीजण होते हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हीडिओंपैकी एका व्हीडिओमध्ये दोन तरुण मोटरसायकलवरून जात असल्याचं दिसतं आहे. तर आणखी एका व्हीडिओमध्ये तीन तरुण दिसत असल्याचं, पोलिसांनी बीबीसीला सांगितलं.
पोलिसांनी दिलेली माहिती
एसीपी श्रीनिवासा राव म्हणाले की, या गुन्ह्यातील सर्व आरोपी तरुण हैदराबादच्या बोराबंदा परिसरात राहाणारे आहेत.
''हत्येत सहभागी असणाऱ्यांचं वय जवळपास 25 वर्षे आहे. आमच्या तपासातून हे स्पष्ट झालं आहे की या यातील सर्व आरोपी फॉल्स सीलिंगचं काम करतात,'' असं एसीपी राव म्हणाले.

पोलिसांनी सांगितलं की तेजसला खूप निर्दयपणं चाकूनं भोसकण्यात आलं. तेजसच्या मृतदेहावर भोसकल्याच्या 12 खुणा आढळल्या आहेत.
''आम्हाला वाटतं की काही जुन्या वादातून हा खून झाला आहे. तपास सुरू आहे. या खुनात सहभागी असणाऱ्या सर्वांना अटक केली जाईल आणि तुरुंगात पाठवलं जाईल,'' असं श्रीनिवासा राव म्हणाले.
आरोपींना अटक करण्यासाठी चार टीम तयार करण्यात आल्या आहेत आणि त्या आरोपींचा शोध घेत आहेत.
इन्स्टाग्रामवर व्हीडिओ व्हायरल
या खूनातील आरोपींनी इस्टाग्रामवर जे व्हीडिओ पोस्ट केले त्यात तेजसच्या खुनासाठी वापरलेले दोन रक्त लागलेले चाकू दाखवण्यात आले होते.
सिद्धू नावाच्या तरुणानं हे व्हीडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. या व्हीडिओंबरोबर रक्तचरित्र या गाण्यातील व्हीडिओ इतर काही जणांना टॅग केला होता.
तरुण रॉयही इन्स्टाग्रामवर 47टीम (47team) नावानं मजेशीर किंवा विचित्र गोष्टी करतानाचा व्हीडिओ टाकायचा.
रक्ताळलेल्या चाकूंचा व्हीडिओ सिद्धू-डीपीओपीई या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता.

आता पोलिसांनी हे सर्व व्हीडिओ काढून टाकले आहेत आणि हे अकाउंट बंद केले आहेत.
व्हीडिओत या तरुणांनी लिहिलं होतं, 'तरुण'च्या आत्म्याला शांती मिळो.
''इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेले व्हीडिओ आम्ही पाहिले आहेत. यासंदर्भात तपास सुरू आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला चाकूचा खुनामध्ये वापर करण्यात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
या व्हीडिओमध्ये तरुणांच्या हातावर जे रक्त दाखवण्यात आलं आहे ते खरोखरंच रक्त आहे की त्यांनी टोमॅटो सॉस लावलेला आहे याचा आम्ही तपास करत आहोत,'' अशी माहिती एसीपी श्रीनिवासा राव यांनी दिली.
या तरुणांची मनोदशा नेमकी कशी आहे?
डॉ. अनिता आरे या मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की या प्रकारच्या कृत्यांचा व्हीडिओ बनवणं आणि नंतर तो सोशल मीडियावर पोस्ट करणं, या व्यक्तिमत्त्वाला समाजविघातक विकृती (अॅंटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) मानलं पाहिजं.
खूनातील आरोपींच्या मानसिक स्थितीबद्दल त्या बीसीसीशी बोलल्या.
''या प्रकारच्या लोकांना इतर लोक काय विचार करतील याची जाणीव नसते किंवा ते त्याचा विचार करत नाहीत. कायद्याची किंवा शिक्षा होण्याची त्यांना कसलीही भीती वाटत नाही. मीडियाचादेखील त्यांच्यावर प्रभाव असतो. याप्रकारच्या घटना पाहून त्यांना वाटतं की तेदेखील सहजपणं असं करू शकतात.''
अनिता यांचं मत आहे की, अगदी तरुण वयातच जर या प्रकारची मानसिकता लक्षात आली आणि त्याला योग्य दिशा दिली तर या प्रकारच्या समाजविघातक विकृती तयार होण्यापासून थांबवता येऊ शकतं.

लहान मुलं जर याप्रकारचं वागत असतील, ऐकत नसतील तर ही गोष्ट सहजतेनं घेऊ नका. पालकांनी अशावेळी कडक असलं पाहिजे आणि या प्रकारांमध्ये मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे. विरोध करण्याची प्रवृत्ती लहानपणीच निर्माण होते. पालकांचं न ऐकणं, त्यांच्या बोलण्याकडं लक्ष न देणं, पालकांचे शब्द गृहीत धरणं हा त्याचाच एक भाग असतो.
या विकृतीचं विश्लेषण करताना अनिता पुढं सांगतात, ''त्यानंतर वागण्यातील विकृतीची सुरूवात शालेय पातळीवर होते. या अवस्थेत इतरांना जर धक्का बसला तर त्यांना आनंद होतो. समाजविघातक विकृत व्यक्तिमत्वाची सुरूवात तरुणपणी होते. त्यांना त्यांचं विचित्र वागणं समाजाला दाखवायचं असतं.''
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)