जर्मनी: स्थलांतरितांना विरोध करणाऱ्या अति-उजव्या पक्षाचा प्रांतातील निवडणुकीत ऐतिहासिक विजय

अॅंटी-इमिग्रेशन अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी (AfD)या पक्षाला निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळालं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अॅंटी-इमिग्रेशन अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी (AfD)या पक्षाला निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळालं आहे. Afd चे नेते जॉर्न हॉक.
  • Author, पॉल कर्बी, जेसिका पार्कर
  • Role, बीबीसी न्यूज

जर्मनीतील पूर्वेकडील थुरिंगिया (Thuringia) प्रांतात झालेल्या निवडणुकीत अती उजव्या विचारसरणीच्या पक्षाला मोठा विजय मिळाला आहे.

अॅंटी-इमिग्रेशन अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (AfD)या पक्षाला निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळालं आहे.

अॅंटी-इमिग्रेशन अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी (AfD)ला जवळपास एक तृतियांश मतं मिळाली आहेत. कंझरव्हेटिव्ह सीडीयू (CDU) पक्षापेक्षा ते नऊ गुणांनी पुढे आहेत. तर जर्मनीतील तीन सत्ताधारी पक्षांपेक्षा एएफडी (AfD)खूपच पुढे आहे.

जर्मनीतील अती उजव्यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एखाद्या प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत अती उजव्यांना विजय मिळाला आहे.

विशेष म्हणजे थुरिंगिया (Thuringia) प्रांतात सरकार स्थापन करण्याची फारच थोडी आशा या अती उजव्या पक्षाला होती. कारण इतर पक्ष त्यांच्यासोबत सहकार्य करण्याची शक्यता नाही.

रविवारी (1 सप्टेंबर) अधिक लोकसंख्या असलेल्या शेजारच्या सॅक्सनी (Saxony) या आणखी एका मोठ्या राज्याच्या निवडणुकीत एएफडी (AfD)हा पक्ष दुसऱ्या स्थानावर होता.

तिथल्या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह सीडीयू (CDU) पक्षाला 31.9 टक्के मतं मिळाली. एएफडीपेक्षा ते थोड्याच मतांनी पुढे होते. तर जर्मनीच्या तीन सत्ताधारी पक्ष फारच मागे पडले होते.

हे तीन सत्ताधारी पक्ष म्हणजे सोशल डेमोक्रॅट्स (Social Democrats), ग्रीन्स (Greens)आणि लिबरल एफडीपी (liberal FDP).

चॅन्सलर ओलाफ शॉल्झ (Olaf Scholz)म्हणाले, "निकाल फारच निराशादायी होते". त्यांनी मुख्य प्रवाहातील इतर पक्षांना अती उजव्यांशिवाय राज्य सरकार स्थापन करण्याचं आवाहन केलं.

त्यांनी अती उजव्यांवर कठोर टीका केली आहे.

प्रांतीय निवडणुकीत विजय

फोटो स्रोत, Getty Images

रॉयटर्सला दिलेल्या वक्तव्यात ते म्हणाले, "एएफडी हा पक्ष जर्मनीचं नुकसान करतो आहे. ते देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करत आहेत. समाजात फूट पाडत आहेत आणि आपल्या देशाची प्रतिष्ठा देखील धुळीला मिळवत आहेत."

जॉर्न हॉक (Björn Höcke) हे एएफडी पक्षाचे थुरिंगियातील सर्वांत महत्त्वाचे उमेदवार होते. ते जर्मनीतील अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी एएफडीच्या या ऐतिहासिक विजयाचं स्वागत केलं आहे आणि त्याविषयी ते मोठ्या अभिमानानं बोलले.

त्यांना प्रांतीय निवडणुकीत थेट विजय मिळवला आला नाही. मात्र पक्षातील ते सर्वांत महत्त्वाचे उमेदवार असल्यामुळे त्यांना प्रांतीय संसदेत एक जागा पटकावता आली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हॉक यांच्या पक्षाला अती उजव्या विचारसरणीचा पक्ष मानलं जातं. 'नाझी घोषणा' वापरल्याबद्दल त्यांना दंड देखील करण्यात आला होता. हॉक यांनी मात्र मुद्दाम असं केलं नसल्याचं म्हटलं आहे. ते आधी इतिहासाचे शिक्षक होते.

शार्लोट नॉब्लोक (Charlotte Knobloch) या जर्मनीतील छळ छावण्यांमधून बचावलेल्या लोकांपैकी (Holocaust survivors) सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती आहेत. दुसरे महायुद्ध सुरू होण्यास 85 वर्षे झाल्याच्या दिवशी निवडणूक झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

निवडणुकीच्या निकालांविषयी त्या म्हणाल्या, या निकालामुळे देश "अधिक अस्थिर, असंवेदनशील, गरीब, कमी सुरक्षित आणि राहण्यास अयोग्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे."

सार्वत्रिक निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रीय जनमत चाचणीत एएफडी दुसऱ्या स्थानावर आहे.

पक्षाच्या नेत्या अॅलिस व्हिडेल (Alice Weidel) म्हणाल्या, निवडणुकीचे निकाल जर्मनीचं सरकार चालवणाऱ्या तिन्ही सत्ताधारी पक्षांसाठी शोकसभेतील संगीत (requiem) होतं. जर्मनीच्या पूर्वेकडील दोन्ही राज्यांतील मतदारांना त्यांचाच पक्ष सत्तेत हवा आहे हे स्पष्ट झाले.

बजॉर्न हॉक

फोटो स्रोत, Getty Images

"आमच्याशिवाय यापुढील काळात स्थिर सरकार शक्य अजिबात शक्य नाही," असंही त्या म्हणाल्या.

बजॉर्न हॉक यांनीदेखील याच मताची पुनरुक्ती केली. ते म्हणाले सीडीयू पक्षाचे असंख्य मतदार आहेत ज्यांना आमचा पक्ष आणि सीडीयूनं एकत्र काम केल्यास आनंद होईल.

थुरिंगियामध्ये इतर पक्षांच्या पाठिंब्याशिवाय एएफडी पक्षाला सरकार चालवता येणार नाही. तर सीडीयू पक्षानं आधीच स्पष्ट केलं आहे की अती उजव्या पक्षाबरोबर ते सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत.

निवडणुकीच्या निकालाचं गणित लक्षात घेता, प्रतिगामी पक्षाला बहुमत गाठण्यासाठी डाव्या पक्षांकडून पाठिंबा मिळवावा लागणार आहे.

रविवारी झालेल्या मतदानासाठी जर्मनीच्या पूर्वेकडील राज्यातील जवळपास पाच लाख नागरिक पात्र होते.

अॅंटी-इमिग्रेशन अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी

फोटो स्रोत, Getty Images

झेडडीएफ (ZDF)या पब्लिक ब्रॉडकास्टरच्या सर्वेक्षणानुसार थुरिंगियामधील 30 वर्षांखालील 36 टक्के मतदारांनी एएफडी पक्षाला मतदान केलं आहे. इतर कोणत्याही पक्षाला झालेल्या मतदानापेक्षा हे प्रमाण खूपच जास्त आहे.

एएफडी मतदारांसमोरील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा स्थलांतराचा होता. त्यातही निर्वासित आणि ज्यांनी जर्मनीत आश्रय घेतला आहे अशा लोकांचा मुद्दा महत्त्वाचा होता.

"राजकारण्यांनी अनेक आश्वासनं दिली आहेत. खासकरून स्थलांतर आणि परदेशी नागरिकांच्या बाबतीत," असं एएफडीला मतदान करणाऱ्या मायकल या मतदारानं बीबीसीला एरफुर्ट या थुरिंगियाच्या राजधानीच्या शहरात सांगितलं.

"मात्र काहीही झालं नाही. काहीह नाही. या राजकीय पक्षांकडून फक्त आश्वासनं मिळत राहिली. आता माझा पक्ष आहे आणि मी त्याबाबतच्या निर्णयावर ठाम आहे," असं तो म्हणाला. त्याची जोडीदार मॅन्युएला त्याच्या शेजारी उभी होती. लोकांना बदल हवा आहे असं तिलाही वाटत होतं.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)