जर्मनीत निवडणूक हरला म्हणून त्याने स्वतःचा देश स्थापन केला, नाणी पाडली, कायदे तयार केले

- Author, जेनी हिल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from बर्लिन
जर्मनीच्या पूर्व भागात गेलात तर एक अदृश्य अशी सीमारेषा सुरू होते. ही सीमारेषा पूर्व जर्मनी आणि तिथल्या ग्रामीण भागाला वेगळं करते. आकाशातून पाहिलं तर झाडाझुडीत एक किल्ल्याचा बुरुज दिसेल. या किल्ल्याच्या एन्ट्रीलाच भला मोठा बोर्ड लावलाय. त्यावर लिहिलंय, "तुम्ही नव्या राज्यात प्रवेश करत आहात." 'कोनिकिसे ड्यूशलँड' किंग्डम ऑफ जर्मनी, असं या राज्याचं नाव. हे राज्य स्वयंघोषित राज्य असून इथं एक राजा राज्य करतोय.
पीटर प्रथम असं इथल्या राजाचं नाव. त्याला याच नावाने ओळखलं जावं अशी त्याची इच्छा आहे. या राज्याची स्थापना होऊन आणि इथल्या राजाचा राज्याभिषेक होऊन आज एक दशक उलटलं असेल. कोनिकिसे ड्यूशलँड राज्याचा स्वतःचा झेंडा आहे, त्यांचं स्वतःचं चलन आहे. त्यांनी त्यांच्या राज्याची ओळखपत्रही बनवून घेतली आहेत.
दुसर्या महायुद्धानंतर जर्मनीच्या सार्वभौमत्वाला मान्यता न देणारे अनेक लोक आजही या देशात राहतात. जर्मनीच्या गुप्तचर संस्थेच्या अंदाजानुसार, इथं 21,000 कॉन्स्पिरसी थेअरिस्ट आहेत. त्यांना 'रीशबर्गर' (रीश नागरिक) असं सुद्धा म्हटलं जातं. पीटर सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. या आठवड्यात रीशबर्गर हे नाव पुन्हा चर्चेत आलं. त्याचं झालं असं की, जर्मनीच्या संसदेची इमारत ताब्यात घेण्याचा कट रचल्याच्या संशयावरून जर्मन पोलिसांनी रीशबर्गरवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 25 लोकांना अटक केली.

पण पीटर म्हणतो की, त्यांचे विचार असे हिंसक नाहीयेत. जर्मन सरकार विनाशकारी आणि संशयी असल्याचं पीटर सांगतो. आम्हाला असल्या हुकूमशाही (फॅसिस्ट) व्यवस्थेचा भाग बनायचं नाहीये, असंही तो सांगतो. राजा असलेल्या पीटरचा एक स्वतःचा टीव्ही स्टुडिओ आहे. लवकरच त्याला स्वतःचा एक टीव्ही चॅनल सुरू करायचा आहे.
स्वतंत्र राज्याची स्थापना
पीटरने महापौरपदासाठी तसेच संसदेच्या सदस्य पदासाठी निवडणूक लढवली होती, मात्र यात त्याला यश काही मिळालं नाही. शेवटी नवं राज्य स्थापन करण्याशिवाय आमच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिला नसल्याचं पीटर सांगतो. "जर्मनीच्या या राज्यव्यवस्थेत प्रामाणिक आणि बदल घडवू इच्छिणाऱ्या लोकांना स्थान नाहीये. उलट तिथल्या व्यवस्थेत भ्रष्ट, गुन्हेगार लोकांनी जागा बळकावल्या आहेत," असं पीटर सांगतो. पीटरचं खरं नाव पीटर फिटझेक असं आहे. पीटरच्या राजवटीला किंवा मग त्याच्या राज्यातील कागदपत्रांना जर्मनीने मान्यता दिलेली नाही. स्वतःच्या राज्यात आरोग्य विमा योजना सुरू केल्याबद्दल त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेत.
आपल्या राज्यातील लोकांकडून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली त्याला काही वर्षे तुरुंगात घालवली लागली. पण त्यानंतर त्याच्यावर सुरू असलेले खटले बंद करण्यात आले.
कॉन्स्पिरसी थेअरी
मागच्या दोन वर्षांपासून एक संस्था पीटर आणि त्याच्या राज्याची हेरगिरी करत आहे. पीटर जर्मनीसाठी धोका असल्याचं या संस्थेने म्हटलंय.
पीटरची व्यवस्था लोकांच्या मनात दहशतवादी विचारसरणी आणि कॉन्स्पिरसी थेअरी रुजवत असल्याचं ही संस्था सांगते. हल्लीच्या काळात जर्मनीमध्ये अशाच पद्धतीच्या काही थिअरीज, विचारधारा पसरवल्या जातायत.
कोव्हीडमुळे याला आणखीन खतपाणी मिळालंय. कोव्हीडच्या काळात पीटरला मिळणारं समर्थन वाढलं असल्याच्या बातम्या मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. पीटर सांगतो की, त्याच्या राज्यात 5000 पेक्षा जास्त लोक राहतात. तो आता त्याच्या राज्याचा विस्तार करतोय. जर्मनीतील जमीन विकत घेऊन लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली जातेय. पीटरच्या राजवाड्यापासून 240 किलोमीटर अंतरावरील एका गावाला आम्ही भेट दिली.

त्या गावाचं नाव बारवल्दे असं आहे. तिथं ही एक जुना किल्ला आहे. हे गाव बर्लिनपासून दक्षिणेला सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. या गावात अंदाजे तीसेक लोक राहतात. इथल्या किल्ल्याची पडझड झालीय, त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. या गावातल्या लोकांना ते पीटरच्या राज्यात राहत असल्याचा अभिमान वाटतो.
'आमचं राज्य, आमचे कायदे'
पीटरच्या राज्यातील लोक त्याने बनवलेले कायदे पाळतात. इथले लोक जर्मनीला कर देत नाहीत. ते आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत. या सगळ्या गोष्टी जर्मनीमध्ये बेकायदेशीर आहेत. पण हे लोक त्यांच्या राजाचे म्हणजेच पीटरने तयार केलेले कायदे पाळतात. त्यांना त्यांची स्वतःची आरोग्यव्यवस्था हवी आहे. ही व्यवस्था जर्मनीपासून स्वतंत्र असावी, अशीही त्यांची इच्छा आहे. बेंजामिन नावाचा एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हल्लीच पीटरच्या राज्यात राहायला गेलाय. सध्या तो तिथं जनसंपर्क अधिकाऱ्याचं काम करतोय.
तो सांगतो, "रोजच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं मिळतात. जसं की, अन्न असेल, सामाजिक सुरक्षा असेल सर्व सोयीसुविधा इथं आहेत." आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत विकास करणं हे या राज्याचं ध्येय आहे. इथल्या लोकांचा आधुनिक वैद्यकशास्त्रावर फारसा विश्वास नाहीये.
बेंजामिन सांगतो, आमच्यापैकी कोणीच कोव्हीडची लस घेतलेली नाहीये.
कोव्हीडच्या साथरोगाचा सामना करण्यात जर्मनीला आलेल्या अपयशाबद्दल अनेक जणांनी जर्मनीचा निषेध केला होता. बेंजामिन सांगतो, "आज स्वत:चा आणि स्वत:च्या हिताचा विचार करणाऱ्यांना लोकांना कॉन्स्पिरसी थेअरिस्ट म्हटलं जातंय. पण हेच लोक जगाच्या समस्यांचा विचार करतात." या राज्याबाहेरील लोकांचं मत मात्र वेगळं आहे. हे लोक म्हणतात की, पीटरच्या राज्यातील लोक जर्मनीतील संसाधने वापरतात त्यामुळे त्यांनी जर्मन कर भरायला हवा. एककाळ असा होता की, रीशबर्गर लोकांची जर्मनीत खिल्ली उडवली जायची. पण आता जर्मनीने या लोकांना गांभीर्याने घ्यायला सुरुवात केलीय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)