अण्वस्त्रांच्या वापराबाबत नवे नियम आणण्याचा पुतिन यांचा प्रस्ताव

व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन
  • Author, फ्रांसेस माओ
  • Role, बीबीसी न्यूज

अण्वस्त्र नसलेल्या देशाला जर अण्वस्त्रधारी देशाचा पाठिंबा असेल आणि त्या अण्वस्त्र नसलेल्या देशाने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही तो हल्ला दोन्ही देशांनी मिळून केला आहे असे समजू आणि त्याच्या प्रत्युत्तरात रशिया अण्वस्त्राचा वापर करेल असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.

युक्रेन हा अण्वस्त्रधारी देश नाहीये पण त्यांना अमेरिकेसह इतर अण्वस्त्रधारी देशांचा पाठिंबा आहे. तेव्हा युक्रेनचा हल्ला हा अण्वस्त्रधारी देशाचाच हल्ला समजला जाईल आणि त्याला प्रत्युत्तर दिले जाईल असे पुतिन म्हणाले.

रशियाच्या लष्करी स्थळांविरोधात पाश्चात्य क्षेपणास्त्राचा वापर करण्याची परवानगी युक्रेनने मागितल्यानतंर पुतिन यांनी बुधवारी (25 सप्टेंबर) हे वक्तव्य केलं.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते गुरुवारी वाशिंग्टनमध्ये युएसचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेणार आहेत. यावेळी युक्रेनच्या क्षेपणास्त्र मागणीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

पुतिन यांच्या वक्तव्यावर झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ अँड्रीय येर्माक म्हणाले, "जगावर धाक दाखवण्यासाठी रशियाकडे अणू हल्ल्याची भीती दाखवण्यापलीकडे काही उपायच नाही. याआधीही त्यांनी अणू हल्ल्याची धमकी दिली होती. तसेच पुतिन यांचं वक्तव्य अतिशयोक्ती असल्याची टीकाही त्यांनी केली होती."

रशियाचा सहकारी देश चीननं सुद्धा शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अणू हल्ल्याविरोधात पुतिन यांना इशारा दिला आहे.

पण, बुधवारी सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर अण्वस्त्र वापराबाबत मोठे बदल होतील असा प्रस्ताव पुतिन यांनी सादर केला आहे.

व्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्लादिमीर पुतिन

या प्रस्तावानुसार अण्वस्त्र वापराच्या अटी अधिक स्पष्ट होतील आणि जर रशियाविरोधात कुणी क्षेपणास्त्रांचा मारा केला तर त्यांच्याविरोधात अण्वस्त्रांचा वापर करता येऊ शकेल असं पुतिन यांनी स्पष्ट केलं.

तसेच देशाच्या सार्वभौमत्वाला गंभीर धोका निर्माण करणारे क्षेपणास्त्र, विमानं आणि ड्रोन आपल्या हद्दीत मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित केल्याचं आढळून आल्यास रशिया अण्वस्त्रे वापरण्याचा विचार करू शकतं, असंही त्यांनी म्हटलं.

अण्वस्त्रधारी राष्ट्राच्या पाठिंब्यानं किंवा समर्थनासह कोणत्याही अण्वस्त्र नसलेल्या राष्ट्रानं रशियाविरुद्ध केलेली आक्रमणं हा रशियन फेडरेशनवरील संयुक्त हल्ला मानला जावा असा प्रस्ताव आहे.

देशाची अण्वस्त्रं ही आमच्या देशाची आणि नागरिकांच्या सुरक्षेची महत्त्वाची हमी असल्याचं पुतिन म्हणाले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मोठ्या देशांनी अणू हल्ले केले तर ते निश्चितच विनाशाकडे जातील हे मानून अण्वस्त्रधारी राज्यांवर दुसऱ्या महायुद्धापासून निर्बंध आहेत.

पण असेही काही अण्वस्त्र आहेत ज्यांचा वापर केल्यास फक्त त्या संबंधित जागेलाच नष्ट करता येऊ शकते आणि पुढे किरणोत्सर्जनाचा परिणाम देखील होऊ शकत नाही.

गेल्या जून महिन्यात पुतिन यांनी युरोपियन देशांना इशारा दिला होता. युएसनं त्यांचे अण्वस्त्र आणले तरी युरोपपेक्षा रशियाकडे अधिक अण्वस्त्र आहेत. युरोपकडे अद्यापही अशी यंत्रणा नाही की जी त्यांना सावधतेचा इशारा देईल. त्यामुळे ते याबाबत फारच पिछाडीवर आहेत, असे पुतिन म्हणाले होते.

आणि याच वेळी अण्वस्त्र वापराच्या संभाव्य बदलांबाबत पुतिन यांनी अप्रत्यक्षपणे सूचवलं होतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पुतिन यांनी सांगितलेले बदल हे पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी इशारा असल्याचे मत राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.

राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, “कोणत्याही मार्गानं आपल्या देशावरील हल्ल्यात सहभागी होणाऱ्या राष्ट्रांसाठी हा एक इशारा आहे. पण, तो अणुहल्लाच असेल असं नाही. तसेच बदल केलेले सिद्धांत प्रकाशित करणार की नाही यावर रशिया निर्णय घेईल.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.