'आमचं गावच काय, निम्मं सांगली पाण्याखाली जाईल', शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांची भीती

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
"आमच्या घरात पाच फूट पाणी आलं. प्रचंड नुकसान झालं. अन्न-धान्याची नासाडी झाली. त्यानंतर घरही पडलं. शेतातही पाणी शिरलं...भयानक! सांगलवाडी जवळजवळ 100 टक्के पूर बाधितच आहे."
सांगलीलगत नदीकाठी वसलेल्या सांगलवाडीत विलास थोरातांचं घर आहे. ते आणि त्यांचे भाऊ इथं राहतात.
पण 2019 च्या पुरात त्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं. काहीसं जुनं असलेलं त्यांचं घर पूर्ण कोसळलं. विलास थोरातांना आजही पडक्या घराजवळून जाताना पुराची नकोशी आठवण येते.
आता त्यांच्या डोळ्यांसमोर त्या आठवणींबरोबर पुन्हा एकदा पुराची भीती दाटली आहे. पण ही भीती पावसाळ्यामुळे नाही, तर यामागचं कारण आहे या भागातून जाणारे दोन महामार्ग आणि अलमट्टी धरणाची वाढणारी उंची.
सांगलवाडी जवळूनच शक्तीपीठ महामार्ग जातो.
गेल्या काही वर्षांत आलेल्या पुराच्या वेळी कुरुंदवाडच्या संगमावरच्या वस्त्यांमध्येही सातत्याने पाणी शिरलं होतं. वस्त्यांवरच्या घरांमध्ये या पुराच्या खाणाखुणा दिसतात.

काही ठिकाणी पडझड झालेली घरं आणि सामान अजूनही तसंच पडलेलं आहे. या महामार्गामुळे पूर वाढला तर संगमावरच्या या घरांचं आणखी नुकसान होईल अशी भीती रहिवासी बोलून दाखवतात.
बीबीसी मराठीशी बोलताना स्थानिक रहिवासी साबीरा इंगळे म्हणाल्या की, "इथे रस्ते वगैरे नव्हते तर एवढा पूर होता की घराच्या वर 6 फूट पाणी होतं. आता रस्ते झाल्यावर किती पूर येईल याचा अंदाज तुम्हीच लावा. सगळं उद्ध्वस्त होणार आमचं. एखाद्याचं गरीब माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाणार आहे."
शक्तीपीठ महामार्ग काय आहे?
802 किलोमीटर अंतराचा वर्ध्यातल्या पवनारपासून पत्रादेवीपर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा 6 लेनचा हायवे सरकारने प्रस्तावित केला आहे.
12 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गाची चर्चा मुळात सुरू झाली ती 2014 पासून. मात्र, तेव्हा पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मुद्दा चर्चेत आला आणि हा प्रस्ताव बारगळला.
पण 28 फेब्रुवारी 2024 ला सरकारने अधिसूचना काढली आणि त्यात शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी कोणत्या जमिनी जाणार आहेत, याची गावे आणि गट नंबरनुसार यादी जाहीर केलं.
वर्ध्यावरून निघणारा हा महामार्ग थेट गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. सरकारी अधिसूचनेत याला 'नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग' असं संबोधण्यात आलं आहे.

प्रस्तावानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
यात माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, कणेरी, पट्टणकोडोली, सिद्धरामेश्वर आदमापूर आणि पत्रादेवी अशी तिर्थक्षेत्रं जोडली जाणार आहेत.
यासाठी 8400 हेक्टर जमिनीचं संपादन सरकार करणार आहे. त्यापैकी 8100 हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे. 12 पेकी 10 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधाचं हेच प्रमुख कारण आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीती कशामुळे?
पवनार ते पत्रादेवीपर्यंत प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षीय नेत्यांनीच विरोध केला होता.
निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग जाणार नसल्याचं आश्वासन दिलं गेलं. पण नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा महामार्ग होणारच असल्याचं जाहीर केलं.
हा महामार्ग एलिव्हेटेड होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी नदीवर पूल प्रस्तावित आहेत. या पुलांसाठी घातला जाणारा भराव आणि पिलर यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन पूरपरिस्थीती बिकट होऊ शकते असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

नागपूर- रत्नागिरी महामार्गावर अनेक ठिकाणी आधीच भराव टाकून रस्ता झाला आहे.
नदीकाठी होणाऱ्या पुलासाठी सर्वेक्षण करून त्याच्यासाठी खांबही रोवण्यात आले आहेत. यामुळेच पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.
'सगळं गाव पाण्याखाली जाण्याची भीती'
अंकली गावात असेच खांब रोवलेले दिसतात.
इथले माजी सरपंच किर्तीकुमार सावळवाडे बीबीसी मराठीशी म्हणाले, "2019चा पूर आला त्यामध्ये अंकली गाव निम्मं बाहेर पडलं होतं. 2021ला तीच परिस्थिती होती.
2021 नंतर जो एनएच 66 नागपूर-रत्नागिरी हायवे सुरू आहे तो जर असाच पुढे झाला तर अंकली गाव कायम पाण्यात राहण्याची भीती आम्हाला आहे.
थोडंसं जरी पाणी वाढलं तरी आम्ही पाण्यात जाऊ, इनामगाव जाईल आणि सांगली निम्मी पाण्यात राहील इतकं बॅकवॉटर येईल."
फक्त सखल भागातच नाही तर उंचवट्यावर असणाऱ्या गावांनाही याचा फटका बसणार असल्याचं स्थानिक सांगतात.
उमळवाडचे रहिवासी प्राध्यापक बाळ संकपाळ यांनी हा मुद्दा सर्वेक्षणासाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांकडेही मांडला.
त्यांच्या मते "हे गाव उंचीवर आहे. 2019, 2021 आणि 2005 ला या गावात मुख्य रस्त्याला 5 मीटरपर्यंत पाणी आलं होतं. जर या गावात रस्ता झाला तर माझ्या गावाला जलसमाधी निश्चित मिळणार आहे.
सोबत कोथळी-दानोळी ही गावं दोन ते तीन महिने पाण्याखाली राहणार आहेत. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरणार आहे. या विस्थापित होणाऱ्या गावाची जबाबदारी शासन घेणार आहे का");