अशोक सराफांना पद्मश्री; जेव्हा त्यांच्या अभिनयाला दिलीप कुमारांनी दाद दिली होती

फोटो स्रोत, DILIP THAKUR
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर विविध छ्टांचे दर्शन अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले.
अशोक सराफ यांचे 'अशी ही बनवाबनवी', 'धुम धडाका', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी,' 'भुताचा भाऊ,' 'पंढरीची वारी', असे अनेक चित्रपट गाजले आहेत.
सहज-सोप्या अभिनय कौशल्याने अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
अशोक सराफांच्या टायमिंगवर शाबासकीची थाप
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनयातील 'टायमिंग'साठी ओळखलं जातं.
सराफ यांच्यातील अभिनयातील टायमिंग सर्वप्रथम कुणी हेरलं असेल, तर ते दिलीप कुमार यांनी.
एका नाटकाच्या वेळी दिलीप कुमार यांनी अशोक सराफ यांच्या अभिनयाचं कौतुक करताना पाठीवर शाबासकीची थापही मारली होती.
दोन वर्षांपूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, "मी दिलीप कुमार यांच्यासोबत कधीच काम केलं नाही. अभिनय क्षेत्रात असूनसुद्धा फारच कमी वेळा आमच्या भेटी-गाठींचा प्रसंग आला. पण त्यांच्याशी झालेली पहिली भेट माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे."
सराफ म्हणतात, "मी त्यावेळी अभिनय क्षेत्रात तसा नवखाच होतो. 'संशयकल्लोळ' नाटकात भादव्याची भूमिका करायचो. आमच्या नाटकाच्या प्रयोगासाठी शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकदा दिलीप कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
दिलीप कुमार यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत सराफ पुढे सांगतात, "नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर आम्हाला सर्वांना दिलीप कुमार यांची भेट घेण्याची संधी मिळाली.
त्यावेळी मला पाहून दिलीप कुमार माझ्याजवळ आले. ते म्हणाले, 'क्या गजबकी 'टायमिंग' है आपकी!' इतकंच नव्हे तर त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीही दिली. मी त्यांचे आभार मानले. त्यावेळी दिलीप कुमार यांच्यासोबत झालेला माझा इतकाच तो संवाद. पण तो प्रसंग कायमचा माझ्या आठवणीत राहिला आहे."
"संशयकल्लोळ नाटकात मी करत असलेल्या भादव्याची भूमिका तशी थोडीफार दुय्यम होती. त्यात टायमिंगला इतका वाव नाही, असं मला त्यावेळी वाटत होतं. पण दिलीप कुमार यांनी त्या भूमिकेतील टायमिंग अगदी चपखलपणे हेरलं. अशा प्रकारची प्रतिक्रिया मला त्याआधी कुणीच दिलेली नव्हती. त्यामुळेच मी खूप भारावून गेलो होतो," असं सराफ यांनी सांगितलं.
अशी ही बनवाबनवी' चित्रपट आजही आपल्या सर्वांच्या आवडीच्या
सचिन पिळगावर दिग्दर्शित 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट आजही सर्वांच्या आवडीच्या चित्रपटांपैकी एक आहे.
दुधाच्या रांगेत खूप वेळ लागणार हे लक्षात आल्यानंतर पोटात कळ येऊन बसकण मारणारा धनंजय माने पाहताक्षणी आपला वाटू लागतो. त्याच्या हातात एक माणूस बाटली देऊन तो माणूस म्हणतो- काही काळजी करू नका. मी रिकामटेकडाच आहे. इतकं खरं वाक्य आपल्या चित्रपटांमध्ये नसतं. या चित्रपटातील अशोक सराफ यांचं 'धनंजय माने' हे आजही डोळ्यांसमोर जसंच्या तसं समोर उभं राहातं.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर अशी एकापेक्षा एक कलाकारांची फौज या चित्रपटात आहे.
या सगळ्यांनी मिळून अक्षरक्ष: कल्ला केला आहे. कोण्या एकाची मक्तेदारी न राहता सगळ्यांनी मिळून धमाल उडवून दिली आहे.
'अशी ही बनवाबनवी' प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं.

फोटो स्रोत, YouTube
पैसा, घराचा आसरा यासाठी कराव्या लागणाऱ्या लढाईतूनही विनोद निर्मिती होऊ शकतो हा विचार बनवाबनवी चित्रपटाने दिला.
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळातही हा स्ट्रगल कायम आहे. तो पार करताना अनेकांची तिशी उलटते. मात्र अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तिशीतही संदर्भांसह चिरतरुण आणि खणखणीत आहे.
'धनंजय माने इथेच राहतात का");